राजकोट : टीम इंडियाने तिसऱ्या निर्णायक सामन्यात श्रीलंकेवर 91 धावांनी धमाकेदार विजय मिळवलाय. श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 16.4 ओव्हरमध्ये 137 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. उमरान मलिक, युजवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्या या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेत अर्शदीपला चांगली साथ दिली. तर अक्षर पटेलने 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना मदत केली. टीम इंडियाने या विजयासह 2-1 अशा फरकाने मालिका जिंकत नववर्षाची झकास सुरुवात केलीय.
श्रीलंकेकडून टॉपच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी धोकादायक ठरण्याआधीच मैदानाबाहेर पाठवलं आणि टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग आणखी सोप केला.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवने केलेल्या नाबाद शतकी खेळीमुळे टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचं मजबूत लक्ष्य दिलं. सूर्याने नाबाद 112 धावा केल्या. त्या व्यतिरिक्त शुबमन गिलने 46 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने वेगवान 35 रन्सचं योगदान दिलं. तर अक्षर पटेलने शेवटी 9 बॉलमध्ये 21 धावा कुटल्या.

श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने 2 विकेट्स घेतल्या. तर राजिथा, करुणारत्ने आणि हसरंगा या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान टी 20 मालिकेनंतर आता उभयसंघात 10 जानेवारीपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डिसिल्वा, चरित असालंका, अविष्का फर्नांडो, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीष तीक्षणा, कासुन रजिता आणि दिलशान मधुशंका.(सौ. tv9 मराठी)