आटपाडी उद्या माता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती : जयंतीनिमित्त आदर्श मातांचा सन्मान : शुभांगी शिंदे यांचे व्याख्यान होणार संपन्न
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी येथे आज दिनांक ०८ रोजी फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती सोहळा संपन्न होत असून या निमित्त तालुक्यातील आदर्श माता यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. तर जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध व्याख्यात्या प्रा. शुभांगी शिंदे यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे. सदरचा कार्यक्रम हा आटपाडी नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी संपन्न होणार असल्याची माहिती विचारमंचचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली.
फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने आटपाडीमध्ये जागर संविधाचा अंर्तगत भव्य अशी सात दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. यामध्ये सलग सात दिवस राज्यातील विविध भागातील प्रख्यात व तज्ञ व्यक्ती यांचे व्याख्यान संपन्न झाले आहे. सलग सात वर्ष हा उपक्रम सुरु असून मागील वर्षापासून विचारमंचच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती. यावेळी आरोग्य तसेच विविध क्षेत्रा मध्ये प्राविण्य मिळविलेल्या २० महिलांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले होते.

यावर्षी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला असून याही वर्षी विचारमंचच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये यश मिळविलेल्या गुणवंत यांच्या आई-पत्नी यांचा पुरस्कार देवून गौरव केला जाणार आहे. तसेच याप्रसंगी प्रख्यात व्याख्यात्या प्रा. शुभांगी शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून सदरचा कार्यक्रम हा आटपाडी नगरपंचायत, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सायंकाळी ४ ते ७ यावेळेत संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विचारमंचचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले आहे.