मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एकटं फिरण्याचं आव्हान दिलं होतं. नारायण राणे यांनी राऊत यांचं हे आव्हान स्वीकारत त्याला प्रत्युत्तर दिले आहे. व संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोपही राणेंनी केला आहे.
राणे म्हणाले, “कुणाला चॅलेंज देतोय? एकटा फिरा असं मला राऊत चॅलेंज देतो. मी काही सरकारकडे संरक्षण मागितलं नाही. 1990सालापासून मला संरक्षण आहे. मी ज्यांच्याविरोधात लढलो. त्यात बाहेरचे लोक होते. त्यांच्या विरोधात लढलो म्हणू मला 90 सालापासून मला संरक्षण दिलं आहे. पोलिसांनी मला जबरदस्तीने मला संरक्षण दिलं आहे, असं राणे म्हणाले.

तसेच ते म्हणाले, माझा इतिहास शिवसेना घडवण्याचा आहे. शिवसेना संपवण्याचा नाहीये. माझ्या वाटेला येऊ नको. संजय राऊत तू जिथं म्हणशील तिथे येतो.. तू सांगशील आज तर आज येईल. उद्या म्हणशील तर उद्याही येईल. उद्या मी त्रिपुराला आहे. त्रिपुराला मीही देवीच्या दर्शनाला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.