शिक्षकाची दबंगगिरी : बस वाहकाला शिवीगाळी : प्रकरण पोहचले थेट आटपाडी पोलीस ठाण्यात
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका गावातील शिक्षकाने दबंगगिरी करत थेट बस वाहकाला शिवीगाळी करत हुज्जत घालण्याचा प्रकार घडल्याने प्रकरण थेट आटपाडी पोलीस ठाणे येथे पोहचले. परंतु प्रकरण आपल्या हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच मात्र दबंगगिरी करण्याऱ्या शिक्षकाने थेट “घालीन लोटांगण” ची भूमिका घेत स्व:ताचा बचाव केला. त्यामुळे या विषयाची मोठी चर्चा रंगली.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील एका गावातील माध्यमिक शिक्षक खानापूर तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये ज्ञानदानाचे पवित्र काम करत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. सदरचा शिक्षक खानपूरहून आटपाडीकडे निघण्यासाठी निघाला एस.टी. बसने निघाला होता. परंतु तिकीटावरून त्याचे सदरच्या बस वाहकासोबत किरकोळ बाचाबाची झाली.

माघार घेईल तो शिक्षक कसला? त्यामुळे त्याने वाहकाची हुज्जत घालत त्याला शिवीगाळी केल्याने बस चालकाने थेट एस.टी. बस आटपाडी पोलिसात ठाणे येथे नेली. या ठिकाणी सुद्धा शिक्षकाने मोठ्या आवाजात बस वाहकास शिवीगाळी चालू ठेवली. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरामध्ये बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्याचवेळी एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने थेट आक्रमक भूमिका घेत त्या शिक्षकास फैलावर घेत, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने त्या शिक्षकाने थेट “घालीन लोटांगण” भूमिका घेत माघार घेतल्याने प्रकरण निवळले व एस.टी. बस थेट पुढील प्रवासास मार्गस्थ झाली. परंतु सदरच्या घडलेल्या प्रकारामुळे पोलीस ठाणे परीसरामध्ये मोठी चर्चा सुरु होती.