मुंबई: राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांना बुधवारी ईडीने साई रिसॉर्ट प्रकरणी 10 कोटींच्या संपत्तीवर तात्पुरती टाच आणल्यानंतर आता म्हाडादेखीलकारवाई करण्याची शक्यता आहे. वांद्रे येथील अनिल परब यांच्या कार्यलयावर म्हाडाकडून हातोडा चालवण्यात येण्याची शक्यता आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे वांद्रे परिसरातील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 57 आणि 58 या ठिकाणी कार्यालय आहे. हे जनसंपर्क कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात यावे अशा आशयाचे पत्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हाडाला दिले आहे. या प्रकरणात काही वर्षांपूर्वी किरीट सोमय्या यांनी हे कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्याची मागणी करणारी याचिका लोकायुक्तांपुढे सादर केले होती. त्यापूर्वी विलास शेगले या व्यक्तीने देखील म्हाडाकडे तक्रार करून हे बांधकाम पाडण्यात यावं अशी मागणी केली होती.

दरम्यानच्या काळात, राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. त्या ‘म्हाडा’कडून ते बांधकाम पाडण्यात आले नव्हते. त्यानंतर आता सरकार बदलल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा हे बांधकाम पाडण्यात यावं अशा पद्धतीचे पत्र म्हाडाला लिहिल आहे. त्यामुळे या पत्रानंतर म्हाडाकडून काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.