मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात तीन मोठे पक्ष ठाकरे गटाविरोधात आगामी निवडणुकांमध्ये प्रत्यक्षपणे आव्हान देताना दिसतील. हे तीन पक्ष म्हणजे भाजप, शिंदे गट आणि मनसे. कारण या तीनही पक्षांमध्ये सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे आगामी काळात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे या तीन पक्षाच्या आव्हानांना कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, शिंदे गटाच्या युवा सेनेच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. सिनेट निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत महापालिका निवडणुका, अयोध्या दौऱ्यासंदर्भातस चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या युवा सेनेची कार्यकारिणी मजबूत करण्यासाठी श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, सध्या आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेची सिनेटवर वर्चस्व आहे. सिनेटचे दहाही सदस्य आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेचे असल्याची चर्चा होती. पण यातील दोन सदस्य सध्या शिंदे गटात आहेत. लवकरच सिनेटच्या निवडणुका जाहीर होतील. यासाठी सर्व पक्षांनी मतदार नोंदणीसाठी कंबर कसलीय.