औरंगाबाद: राज्य सरकार स्थापन होऊन आता चार महिने होत आले आहेत. मात्र, अजूनही राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार झालेला नाही. त्यावर आता राज्य सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले, ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना वाटेल त्यावेळेला विस्तार होईल. आताच एवढी गडबड करण्यात काही अर्थ नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत नेहमीप्रमाणे त्यांचं मत मांडत असतात. त्यांना काही महत्त्व देण्याची गरज नाही. योगी आदित्यनाथ इकडे आले. त्यांचे स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. उद्योग पळवले जात नाहीत. त्यांनी रोड शो केला म्हणजे वाईट वाटण्याचं काही कारण नाही, असं सांगतानाच आपल्या राज्यात उद्योग यावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत, असं शिरसाट यांनी सांगितलं.