परभणी : परभणीतील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी, तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला जीवदान मिळालं नाही तर मी आत्महत्या केली असती, असं भावनिक विधान केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली.
रत्नाकर गुट्टे म्हणाले, ‘ माझे भाऊ, बहीण सगळे तुम्ही आहात. एका परिवाराप्रमाणे. माझं जगणं-मरणं जे काही आहे, ते या परिवारासाठी आहे. तुम्ही मला जीवदान दिलंय. निवडणुकीत हरलो असतो तर मला आत्महत्या करावी लागली असती. मी खोटं कधी बोलत नाही. बोलणार नाही. तुम्ही निवडून दिलं म्हणून मी बोनस जगतोय. त्यामुळे हे सर्व तुमच्यासाठी आहे… असं वक्तव्य आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.

दरम्यान, आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्ष अर्थात रासपच्या वतीने 2019 मध्ये निवडणूक लढले. या निवडणुकीच्या आधीच ते तुरुंगात होते. शेतकऱ्यांच्या नावावरील कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होता. याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 2019ची निवडणूक त्यांनी तुरुंगातूनच लढली होती. त्यावेळची मनःस्थिती त्यांनी आज पूर्णा येथे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यानिमित्त सत्कार कार्यक्रमात बोलून दाखवली.