मुंबई: २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मोदी सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये जनतेला संबोधित करत नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाद्वारे एका झटक्यात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या होत्या. या निर्णयानंतर देशभरात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. नोटा बदलण्यासाठी नागरिकांना आपली कामे सोडून रांगेत उभे राहावे लागले होते. रांगेत उभे राहिल्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त तेव्हा समोर आले होते.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात तब्बल ५८ याचिका दाखल झाल्या होत्या. या सुनावणीत खंडपीठाने मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे.