पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारी रोजी हजारो नागरिक येतात. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुण्यासह राज्यातील ७० जणांना या कार्यक्रमाला येण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. व ट्विटरवरुन अभिवादनाचे फोटो शेअर करत भूमिका मांडली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून, माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणणाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती. आताही मी भीमा कोरेगाव ला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलो तर पुन्हा शाई फेकू म्हणून धमकी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे, परंतु हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमाकोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये, अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे. असे पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत. त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून विजयस्तंभास मानवंदना देणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.