मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये व सक्तीची वीज वसुली थांबवावी याबाबत घोषणा केली होती. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अजूनही सक्तीची वीज वसुली सुरूच आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याने उपमुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील माझोड गावच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दशरथ गजानन मुळे असे या शेतकऱ्याचे नाव असून मुळे यांनी थेट सेनगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीची वीज वसुली थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर आपण शेतात लागवड करण्यासाठी रोपांची खरेदी केली. मात्र रोपांची वाढ होत असताना अचानक शेतातील वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने सगळी रोपे सुकली आणि प्रचंड आर्थिक नुकसान झाल आहे, असा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले असल्याने आपण तक्रार दाखल केल्याचं या शेतकऱ्यांन सांगितलं आहे.