नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार आज सरकारवर चांगलेच भडकले. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार बोलायला उभं राहिले. त्यावेळी सभागृहात मंत्री हजर नव्हते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही हजर नव्हते. गिरीश महाजन यांच्या खात्याशी प्रश्न असताना तेही उपस्थित नव्हते. त्यामुळे अजितदादा भडकले आणि त्यांनी महाजन यांनाच थेट टार्गेट केलं.
पवार म्हणाले, “आम्ही काही एकदम इथे बसलेलो नाहीये. मंत्र्यांचं काम आहे इथे यायचं. जर मंत्री नाही आले तर त्यांना जाब कोण विचारणार? असा सवाल करतानाच एकवेळ आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं समजू शकतो. त्यांना जास्तीची कामे असतात. दुसरे उत्तरं देतात आम्ही मान्य केलं. पण कोणीच आलं नाही तर कसं चालेल? असा सवाल अजित पवार यांनी केला.
तसेच ते पुढे म्हणाले, “गिरीश महाजन सभागृहात का नाही आले? सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात. अरे पुढच्या अधिवेशनात…? पुढच्या अधिवेशनापर्यंत कोण राहतं आणि कोण जातं हे माहीत नाही. ही कोणती पद्धत झाली? तुम्हीही काही बोलत नाही. काही नाही. सर्वांचे लाड चाललेत लाड, असा संताप त्यांनी व्यक्त केला.