आटपाडी : आटपाडी येथील धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संजय गेळे या आरोपीस आटपाडी पोलीसांनी अटक केली. आटपाडी येथील वरद हॉस्पीटलमध्ये संजय गेळे व त्यांची पत्नी अश्विनी या दोघांनी अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटीलेटरवर असणाऱ्या महिलेच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करून तंत्रमंत्र, अंधश्रध्दा पसरवली होती. याबाबत संपतराव नामदेव धनवडे यांनी फिर्याद दिली होती.
आटपाडीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व पोलीस प्रमोद रोडे, शंकर पाटील यांनी बुधवारी (दि.२८) रात्री सापळा रचून संजय गेळेला अटक केली. परंतु त्याची पत्नी अश्विनी मात्र, अद्याप फरार आहे. वरद हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना न जुमानता धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी गेळे दाम्पत्यावर तात्काळ कारवाई करावी, त्यांना अटक करावी, अशी मागणी केली. याबाबत २५ डिसेंबरला आटपाडी शहरात एक दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. दरम्यान, आज (दि.२९) संशयित आरोपी संजय गेळेला आटपाडी न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.