नागपूर : विधान परिषदेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उल्लेख करत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “मूळ चर्चा काय आहे? तर 83 कोटींचा भूखंड दोन कोटीला कसा विकला गेला? हा प्रश्न भाजपच्या आमदारांनी का तारांकीत म्हणून नोंदवला? आज सभागृहात तब्बल चार मंत्र्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. त्यामुळे तब्बल चार मंत्री अडचणीत आले आहेत. हे चारही मंत्री शिंदे गटातील आहे. म्हणजे टीम भाजप पद्धतशीरपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे मंत्र्यांनाही अडचणीत आणत आहे”, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दहा-पंधरा दिवसांपूर्वी म्हणाले होते की आम्हाला फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून बसवायचं आहे. ते पद्धतशीरपणे कारस्थान पुन्हा एकदा पूर्णत्वास नेलं जात आहे. इकडे चर्चेची राळ उडवाची आणि तिकडे षडयंत्र आखायचं ही देवेंद्र फडणवीस यांची नीती कौतुकास्पद आहे”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.