मुंबई: हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गायरान जमीन घोटाळ्यावरून आरोपांच्या फैरी झडत आहे. हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाकडून विधानभवनाच्या पायरीवर मंत्री उदय सामंत, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संजय राठोड आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. याचदरम्यान घोटाळ्याच्या आरोपानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘आज मी सकाळपासून मी विधानसभा आणि परिषदेत व्यग्र होतो. अनिल परब यांनी माझ्यावर काही आरोप केले आहेत. मी कामकाजात व्यस्त होतो म्हणून बोलू शकलो नाही. नावली तालुका महाबळेश्वर येथे माझी शेतजमीन आहे, २००३ साली मी शेतजमीन खरेदी केले आहे. जमीन आणि जमिनीत असणारे घर यासोबत मी खरेदी केली आहे. अनिल परब यांनी केलेला आरोप खोटा आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, “’मुख्यमंत्री, अब्दुल सत्तार,संजय राठोड आणि माझ्यावर आरोप केले पण पुरावा नाही. शिल्लक सेनेच्या आमदाराचा त्यांच्या नेत्यांना दाखवण्यासाठी आरोप होतोय. त्यांना आम्ही केलेल्या उठावाचा धक्का बसला म्हणून हे शिल्लक सेनेचे अनिल परब आरोप करत आहेत, असा हल्लाबोल शंभूराज देसाई यांनी केला.