नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर वाशिम जिल्ह्यातील गोचरणाची 150 कोटींची सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणावर अब्दुल सत्तार यांनी आज काहीच ठोस अशी भूमिका मांडली नाही. तर सत्तार यांच्या पक्षाचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सभागृहात उपस्थित नव्हते. ते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्लीला गेले होते. पण आता ते नागपुरात दाखल झालेत.
माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी आज विधानसभेत जो काही गदारोळ झाला, अब्दुल सत्तार यांच्यावर जे काही आरोप झाले त्याची माहिती घेतल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी अब्दुल सत्तार यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांची सविस्तर बाजू ऐकून घेतल्याची माहिती सूसमोर आली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांच्या फोनवरील संभाषणानंतर सत्तार उद्या स्वत: विधानसभेत आपल्यावर झालेल्या आरोपांवर सविस्तर उत्तर देणार आहेत, अशी माहिती समोर आलीय.