आटपाडी : आटपाडी येथील रुग्णावर जादूटोणा भोंदूगिरीने उपचारासह धर्मांतराचा आरोप असलेला संजय गेळे व अश्विनी गेळे या पती-पत्नीवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल आहे. गेळे कुटुंबाने केलेल्या धर्मांतर प्रकारच्या निषेधार्थ उद्या रविवारी आटपाडी शहर बंद ची हाक देण्यात आली आहे.
वरद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात रुग्णांचे नातेवाईक असल्याची खोटी माहिती देवून गेळे पती-पत्नीने दवाखान्यातील आयसीयूमध्ये विनापरवानगी प्रवेश केला. सोनाली शिवदास जिरे (१८, रा. मापटेमळा आटपाडी) हिच्या कपाळावरून बोटे फिरवून टॅबमधील मजकूर वाचून बोटाने शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवले.

रूग्णाच्या नातेवाईकांनी जरी याबाबत तक्रार दिली नसली तरी, धर्मांतराचा विषय गंभीर असून त्या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. दवाखान्यातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकभावना तीव्र होत विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदन देत भोंदूगिरी, अंधश्रध्दा पसरवत धर्मातराचे रॅकेट गेळे कुटुंब चालवत असून त्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याची मागणी करत धर्मांतर प्रकरणाचा निषेध म्हणून रविवारी आटपाडी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.