बुलढाणा: संजय राऊत यांचं वात्रट तोंड, त्यांच्या नेत्यांची अकार्यक्षमता त्याला कंटाळून आमदार फुटले. आमदारांनी उठाव केला, असं सांगत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.
यावेळी संजय गायकवाड म्हणाले, राऊत यांनी कितीही वात्रटपणा आणि चभरेपणा केला तरी त्यांची टीका लोकांच्या पचनी पडणार नाही. कारण 11-11 मंत्री सत्तेतून बाहेर गेले. कोणी पैशासाठी मंत्रिपद सोडत नसतं. पाच-पाचशे आणि हजार-हजार कोटी घेऊन लोकं मंत्रीपदासाठी तडफडत असतात. त्यामुळे आता जे आरोप केले जात आहेत, ते नालायकासारखे आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

तसेच ते पुढे म्हणाले, “ठाकरे सरकार असताना कोणत्याच प्रकारची कामे होत नव्हती. आमदारांना वर्षावर प्रवेश नव्हता. मातोश्रीवर प्रवेश नव्हता. घरून सरकार चालवलं जायचं. त्यामुळे दोन वर्षाने आमदार लोकांना उत्तर काय देणार? हा प्रश्न होता. म्हणूनच सर्व आमदारांनी उठाव केला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावर जो अन्याय सुरू होता, त्यामुळे आमदार त्यांच्यापाठी उभे राहिले, असं संजय राठोड यांनी सांगितलं.