मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 109 कोटी रुपयांचे भूखंड फक्त 2 कोटींना विकले, मुख्यमंत्री अचानक दिल्लीला का आले? यासंदर्भात त्यांची दिल्लीश्वरांसोबत चर्चा झाली का? असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.त्यामुळे आधी खोकेवाल्यांची एसआयटीद्वारे चौकशी करा, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, ‘आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जायला तयार आहोत, हे सरकार तोंडावर पडेल. सरकार पक्षातील अनेक आमदारांची अनेक प्रकरणे समोर आली आहे. त्यांचाही आता तपास होईल, आम्ही दोन दिवस नागपुरात जाणार आहोत, तेव्हा अनेक विषय आम्ही समोर आणू, त्याच्यावरही एसआयटीची मागणी करू, या सरकारला एसआयटी स्थापन करण्याची खाज आहे, खाजवत बसा’, असा इशाराही संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केली. दुसरीकडे सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी आधी खोकेवाल्यांची एसआयटी चौकशी करा, असे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.