मुंबई: चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरू असल्याने केंद्र सरकारनं सर्व राज्यांना अॅलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोविड १९ चा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, तयारी आणि कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम आदींबाबतचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली. टेस्ट-ट्रॅक-ट्रीड आणि लसीकरण यावर अधिक लक्ष केंद्रीत करावे, तसेच, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आणि आगामी उत्सव काळात मास्क, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन होईल हे सुनिश्चित करावे, असेही ते म्हणाले. तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व तयारी करण्यास सांगितले.
दरम्यान, डॉ. मांडविया यांनी चीनमधील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता भारताची काय तयारी आहे, याबाबत स्वतः राज्यसभेत माहिती दिली होती. आम्ही सातत्यानं भारतातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. चीन आणि भारत या दोन्ही देशांत थेट अशी विमानसेवा नाही. पण लोक पर्यायी मार्गाने येत आहेत, असं ते म्हणाले होते. कोरोना विषाणूच्या कोणत्याही अज्ञात प्रकाराने भारतात शिरकाव करू नये, हे सुनिश्चित करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत असेल, असेही ते म्हणाले होते.