नवी दिल्ली: महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल आणि चिथावणी दिल्याबद्दल बोम्मईंवर खटले दाखल करा, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारला ललकारले.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “कर्नाटकाने जो निषेध ठराव केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने सोमवारी कर्नाटकाचा निषेध ठराव मांडून मंजूर करावा. ते माझ्यावर आणि जयंत पाटलांवर खटला दाखल करू पाहत आहेत. तुम्ही माझ्यावर खटले काय दाखल करता? कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर खटले दाखल करा. तुम्ही महाराष्ट्राचे पाईक असाल तर बोम्मईंवर खटले दाखल कराच.

तसेच, महाराष्ट्र आणि कर्नाटकात आग लावण्याचे काम बोम्मई करत आहेत. दिल्लीत गृहमंत्र्यांसमोर जे ठरले होते. ते ते मानायला बोम्मई तयार नाहीत. आपल्याच पक्षाच्या नेत्याचे आदेश मानत नाहीत. ते आमचे संस्कार आणि संस्कृती काढत आहेत. त्यांनी आमचे संस्कार काढण्याची गरज नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तोंडं बंद आहेत. त्यामुळे बोम्मई यांची जीभ वळवळतेय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, जर ते आम्हाला चीनचे एजंट म्हणत असतील तर चीनच्या पंतप्रधानांना, राष्ट्रप्रमुखांना अहमदाबादमध्ये बोलावून झोपाळ्यावर झुले देऊन, पापडी गाठिया खायाला घालून त्यांचा सन्मान करणाऱ्यांना काय म्हणाल? आम्ही चीनचे एजंट कसे? असा सवालही त्यांनी केला.