नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचे प्रकरणावर विरोधी पक्ष सभागृहात चर्चा करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी सोमवारी राज्यसभेतून सभात्याग केला. विरोधकांच्या या भूमिकेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी पियुष गोयल म्हणाले, “काँग्रेस पक्ष या मुद्द्यावर राजकारण करत आहे. संसदेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, यूपीएची सत्ता असतानाही अशा संवेदनशील विषयांवर चर्चा झाली नाही. एकीकडे लष्कर सीमेवर खंबीरपणे उभे आहे, तर राहुल गांधी अशी वक्तव्य करून लष्कराचे मनोधैर्य खचविण्याचे काम करत आहेत.”
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, चीन आमच्या जमिनीवर कब्जा करत आहे. या विषयावर आपण चर्चाच करणार नाही तर आणखी कशावर चर्चा करणार? या विषयावर सभागृहात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. भारत-चीन सीमा वादावर चर्चा करण्याची नोटीस फेटाळल्यामुळे विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला.