मुंबई: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सीमावादाचा मुद्दा तापला आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देतानाच, आमचं सरकार सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी उभं आहे, जी मदत लागेल ती पुरवू, अशी ठाम भूमिका फडणवीसांनी मांडली.
फडणवीस म्हणाले, “सीमाभागातील आमच्या बांधवांच्या पाठिशी सभागृह आणि सरकार आहे. आजपर्यंत दोन राज्ये भांडत होती. पण केंद्राने लक्ष दिलं नाही. आता गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. आपल्या नेत्यांनी गृहमंत्र्यांकडे स्पष्ट भूमिका मांडली. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे ट्विट्स हे प्रक्षोभक आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ते ट्विट्स माझे नसल्याचं स्पष्ट केलं. त्या बैठकीत कुणीही वेगळा दावा करणार नाही. नागरिकांवर अत्याचार होणार नाही, वाहनांवर दगडफेक होणार नाही, तसेच, त्या बैठकीत तीन-तीन मंत्री नेमायचे. दोन राज्यात समन्वय राहिले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमाभागावर ठाम भूमिका मांडतानाच, तेथील नागरिकांसाठी योजनांवर काम करत आहोत, असं सांगितलं. सीमा भागातील गावांना सोयीसुविधा देण्यासंदर्भात आम्ही योजना आखत आहोत. तेथील गावांना भडकावण्यामागे राजकीय हेतू असल्याचे समोर आल्याचेही यावेळी फडणवीस म्हणाले.