कोल्हापूर – सध्या महाराष्ट्रात सैन्य दलामध्ये आणि पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून स्टेरॉईडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूर पाठोपाठ लातूरमध्येही स्टेरॉईडचे इंजेक्शन्स भरतीच्या ठिकाणी सापडले आहेत.
माहितीनुसार, “सैन्य दलात भरती होण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. या भरती प्रक्रियेचा एक टप्पा कोल्हापूर जिल्ह्यात पार पडला. मात्र ही भरती एका वादात सापडली. भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून शिवाजी विद्यापीठ परिसरात चक्क स्टेरॉईडचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. या परिसरात असणाऱ्या स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या प्रमाणातचे इंजेक्शन्स सापडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दल आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे.

दरम्यान, भरती प्रक्रिये वेळी जरी विद्यार्थ्यांनी स्टेरॉईडचा वापर केला असला तरी भरतीमध्ये मेडिकल टेस्ट केली जाते आणि यामध्ये त्याचा अंश सापडला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचा अवलंब करू नये. निवड चाचणी वेळी मेडिकल टेस्ट मध्ये स्टेरॉईड किंवा इतर घटकांचा अंश सापडला तर भविष्यात विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी परीक्षा देता येणार नाहीत.