धुळे – धुळ्यात फागणे गावातील सीमा कुंभार या नवरीने आधी लगीन लोकशाहीचे आणि त्यानंतर स्वतःचे असं म्हणत लग्नाच्या मंडपात प्रवेश करण्यापूर्वी मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे. या नवरीने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
माहितीनुसार, आज राज्यातील विविध ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्याचबरोबर लग्नाचा देखील आज मुहूर्त असून लग्नापूर्वी आपलं कर्तव्य बजावत नवरी मुलगी लग्नाची लगबग सोडून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी सकाळी मतदान केंद्रावर पोहचून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण 128 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली असून यातील दहा ग्रामपंचायती यापुर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. आता उर्वरित 118 ग्रामपंचायतींसाठी जिल्ह्यातील एकूण 464 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.