मुंबई: भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल सतत करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येत आला. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशानं पाहिला असेल. आजवर आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्यानंतर असं दृश्य सगळ्या जगानं पहिल्यांदा पाहिलं असेल, असे ते म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो म्हणणारे तोतये आहेत. आमची खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आम्ही तडजोड होऊ देणार नाही आणि असं जो कुणी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.
दरम्यान, यावेळी शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मोर्चात सहभागी झाले होते.