“कोणत्याही क्षणी संजय राऊत यांचे बारा वाजवतील, आता 12 नगरसेवक आले, अजून…” शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान
ठाणे: नाशिकमधील 12 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्याकडे ठाकरे गटाने नाशिकची जबाबदारी दिली आहे. राऊत यांनी नाशिकचा दौरा करून संघटन बांधणी केली होती. मात्र, राऊत यांची पाठ फिरताच नगरसेवकांनी बंड केलं. हाच धागा पकडून माजी महापौर आणि शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे.
नरेश म्हस्के म्हणाले, “आज नाशिकमधील 12 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घोडदौड करण्यासाठी त्यांनी नव्याने सुरुवात केली आहे, संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत अजय बोरस्ते होते. बोरस्तेंना घेऊन ते फिरत होते. आज त्याच बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले, “नाशिककर कोणत्याही क्षणी संजय राऊत यांचे बारा वाजवतील हे मी गेल्याच आठवड्यात बोललो होतो. त्यांनी राऊत यांना आज क्लिन बोल्ड केलं. चार टप्पे बॉलवर त्यांची विकेट गेली आहे, तसेच, हे फक्त 12 नगरसेवकच नाही तर 32 नगरसेवक आहेत. त्या 32 नगरसेवकांमधल्या 12 नगरसेवकांचा हा पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा काही दिवसात तुम्हाला दिसेल. तुमच्याकडे नाशिकमध्ये किती नगरसेवक शिल्लक राहतील हे 2024 पर्यंत पाहा. तुम्हाला औषधला सुद्धा माणूस सापडणार नाही, असा दावा त्यांनी केला.