महाड महाड तालुक्यातील कोथेरी येथे एका ३५ वर्षीय महिलेवर पतीच्या मित्रानेच बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून महाड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काशिनाथ कृष्णा पवार, आशा काशिनाथ पवार आणि अभी काशिनाथ पवार, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार, आरोपी काशिनाथ पवार हा तिच्याच पतीचा मित्र आहे. पीडितेचा पती आजारी असल्याने तो आपल्या पत्नीसह पीडितेच्या घरी आला होता. यावेळी तुझ्या पतीवर देवदेवस्की केल्याचे सांगून आरोपी काशिनाथ आणि त्याच्या पत्नीने पीडित महिला आणि तिच्या पतीच्या अंगावरून तांदुळ उतरवले. त्यानंतर सोबत कागदाच्या पुडीतून आणलेले पावडर त्याने पीडित महिला आणि तिच्या पतीला पाण्यात मिसळून दिले. दरम्यान, पावडरचे पाणी पिताच फिर्यादी महिला आणि तिचा पती बेशुद्ध झाले. यानंतर आरोपी काशिनाथ याने फिर्यादी महिलेवर बलात्कार केला. व त्यानंतर त्याने पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तब्बल सहा महिने पीडितेवर बलात्कार केला. तसेच, आरोपीने पीडितेला धमकावत तिच्याकडून तब्बल १२ लाख रुपये देखील उकळले.

दरम्यान, आरोपी काशिनाथ याचे कृत्य दिवसेंदिवस वाढतच असल्याने अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून महाड शहर पोलिसांनी आरोपी काशिनाथ पवार त्याची पत्नी आशा पवार आणि मुलगा अभी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी हे मुंबईच्या चेंबूर परिसरातील रहिवाशी आहे.