मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय रण पेटलेलं आहे. हा मुद्दा उद्या, शनिवारी मोठ्या प्रमाणात तापणार असून, महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. तर भाजप मुंबई ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे.
माहितीनुसार, महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उद्या, शनिवारी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा टीझरच महाविकास आघाडीकडून व्हिडिओ रुपाने प्रसिद्ध केला आहे. तर संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरून केलेल्या वक्तव्यावरूनही भाजप आक्रमक झाला आहे. भाजप मुंबईतर्फेही उद्या शहरात माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, हिंदू-देवदेवता आणि महापुरूषांबद्दल वारंवार अपमानास्पद वक्तव्ये करून समाजाच्या भावना दुखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मुंबई भाजपतर्फे उद्या संपूर्ण मुंबईमध्ये “माफी मांगो” आंदोलन करणार, असे आशिष शेलार म्हणाले. (सौ. साम)