सातारा: ज्या थोर पुरुषांनी लोकांसाठी आपलं आयुष्य झिजलं. वाटेल त्या परिस्थितीत लोकांचं कल्याण व्हावं, लोकं मोठी व्हावीत, त्यांचा विकास व्हावा हाच त्यांचा ध्यास होता. पण या महापुरुषांची बदनामी केली जात आहे. वारंवार केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचीही वेगवेगळ्या मार्गांनी बदनामी केली जात आहे. चित्रपट आणि विधानातून ही बदनामी होत आहे. ही विकृती दिवसे न् दिवस कमी होण्याऐवजी वाढत आहे. ती वेळीच रोखली पाहिजे, असं आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं.
जग खूप वेगाने पुढे जात आहे. लोक फारसा विचार करत नाही. लोकांनी विचार करायचं बंद केलं आहे. प्रत्येकाचं जीवन व्यस्त झालं आहे. लोक कामात मग्न झाले आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मूलभूत विचाराचा लोकांना हळूहळू विसर पडू लागला आहे. हे एका दिवसात झालं नाही, अशी सल उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवली.
तसेच ते पुढे म्हणाले, “शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला होता. तो विचार राहिला आहे का? कारण नसताना जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे. भेदभाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे सर्वधर्म समभाव हा विचार मागे पडताना दिसत आहे, असं ते म्हणाले.( सौ. tv9 मराठी )