पुणेः भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड आकस आहे. त्यांच्याच अधिपत्याखाली एका-एका राजकारण्याकडून महापुरुषांचा ठरवून अपमान केला जातोय. अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. पुणे बंदच्या मोर्चाला उद्देशून अंधारे यांनी भाषण केलं.
यावेळी अंधारे म्हणाल्या, “फडणवीस यांच्या मनात या महापुरुषांबद्दल आकस नसता तर त्यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर तत्काळ प्रतिक्रिया दिली असती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण असं संबोधल्यानंतर फडणवीस यांनी कशी तत्काळ माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. तशी प्रतिक्रिया राज्यपालांच्या वक्तव्यावर दिली नाही, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, शिवरायांचं नाव घेऊन भाजपमधून आमदारकी, खासदारकी, इतर पदांच्या तुटपुंज्या पदांसाठी बाहेर निघत नाहीत. या गोचिडांपेक्षा गुन्हे अंगावर घेणाऱ्या वाघांचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं.