नांदेडः नांदेडमध्ये अवघ्या चौथीत शिकणाऱ्या मुलीने हॉस्टेलमध्ये गळफास लावत संशयास्पद आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. हदगांव तालुक्यातील केदारगुडा इथल्या शासकीय आश्रम शाळेच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. विश्रांती देशमुखे असे मयत मुलीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मुलीने आत्महत्या केल्याचे वसतिगृह प्रशासनाने कुटुंबाला कळवले होते.
माहितीनुसार, चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या माझ्या लेकीनं आत्महत्या केल्याचा दावा केला जातोय, तिने वसतिगृहाच्या खोलीचा दरवाजा आतून लावला, पलंगाला गळफास घेतल्याचं म्हटलं जातंय. पण इवल्याशा लेकीचा साडे ६ फूट दरवाजाच्या कडीला हातही पुरत नाही तर ती आतून कडी लावून आत्महत्या कशी करेल, असा प्रश्न मुलीच्या पित्याने केला आहे. चौथीत शिकणाऱ्या एका मुलीचा मृतदेह वसतिगृहातील पलंगाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्याचं सांगतायत. पण तिच्या मृतदेहावरून तर तसं दिसत नाहीये, असा आरोप गावकरी आणि नातेवाईकांनी केलाय. घटनेने वसतिगृहाचे संचालक आणि पोलीस मिळून हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुलीचे नातेवाईक करत आहेत. माझ्या लेकीसोबत नेमकं काय झालं, हे लपवू नका, खरं काय ते सांगा, अशी कळकळीची विनंती तिचे नातेवाईक करत आहेत.

दरम्यान, नांदेडच्या सरकारी रुग्णालयात मुलींचे इन कॅमेरा पोस्ट मार्टम करण्यात येत आहे. मुलीच्या वडिलांनी आत्महत्येच्या घटनेवर संशय व्यक्त करत सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तर अतिरिक्त महिला पोलीस अधीक्षक यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.