नवी दिल्ली: ९ डिसेंबर रोजी तवांगमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीमुळे नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, विरोधकांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास चालू दिला नाही आणि मी या कृत्याचा निषेध करतो. तवांग संघर्षाच्या मुद्द्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत निवेदन करणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्र्यांनी स्पष्ट केल्यावर विरोधकांनी हे कृत्य केले. जेव्हा मी प्रश्नोत्तराच्या तासाची यादी पाहिली आणि प्रश्न क्रमांक 5 पाहिल्यानंतर मला काँग्रेसची चिंता समजली. एक प्रश्न राजीव गांधी फाउंडेशनचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट परवाना रद्द करण्याबाबत होता,असे ते म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, “भारताची एक इंच भूमी कोणीही काबीज करू शकत नाही. ८ डिसेंबरच्या रात्री आणि ९ डिसेंबरच्या सकाळी आपल्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे मी कौतुक करतो. भारतीय सैन्याने काही वेळातच घुसखोरी करणाऱ्या सर्व चिनी सैनिकांचा पाठलाग करून आपल्या भूमीचे रक्षण केले, असे त्यांनी वक्तव्य केले.