नवी दिल्लीः महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न चिघळले असताना अहमदाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट झाली. या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. या भेटीच्या पद्धतीवरून संजय राऊत यांनी टीका केली.
ते म्हणाले दोन मुख्यमंत्री सीमाप्रश्नासारख्या गंभीर मुद्द्यावर रस्त्यात बोलतात. जाता-जाता, सहज भेटतात आणि बोलतात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. या सीमाप्रश्नासाठी 55-60 वर्षांपासून जे लोक लढतायत, शहीद होतायत, तो प्रश्न तुम्ही श्राद्ध उरकल्यासारखं दोन मिनिटात आटोपता? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला सातत्याने हल्ले करतायत, धक्के देतायत.. पण आपले मुख्यमंत्री या मुद्द्यावर रस्त्यात बोलतात, हा जनतेचा अपमान आहे, याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.