जालनाः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे.
पंतप्रधानांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकावर आधी बोला . कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जी आरेरावी सुरु आहे, तिच्या बद्दलही तुम्ही सणकून बोललेच पाहिजे. अख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकवरील भूमिकेची वाट पाहतोय. एका मोठ्या रस्त्याचे तुम्ही उद्घाटन करत असताना… महाराष्ट्रासाठी कर्नाटक आपले रस्ते बंद करत असताना पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांना काय बोलणार आहात, ते तुम्ही बोला आणि मग शिवसेना प्रमुखांच्या नावाने असलेल्या महामार्गाचं उद्घाटन करा, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले.

तसेच ते पुढे म्हणाले, ‘ स्वतः पंतप्रधान येत आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यावर ते पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतील. बोलण्याचा तुमचा अधिकार आहे. पंतप्रधान आहात तर देशाच्या पालकासारखे बोला. महाराष्ट्र म्हणजे पालकाची भाजी आहे, असं समजू नका. आम्ही एवढे मिंधे नाहीयेत. जे होते ते निघून गेले, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला लगावला.