मुंबई: काल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणच्या संत पिठाच्या कार्यक्रमात बोलतांना, शाळा चालू करण्यासाठी फुले- आंबेडकरांनी भीक मागितली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता, तर अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले. त्यामुळे अखेर चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, भीक म्हणजे काय तर आपण महापुरुषांच्या जयंतीसाठी किंवा वेगवेगळ्या उत्साहाच्या वेळी वर्गणी जमा करतो. त्यामुळे या भीक शब्दाने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी एवढ्या छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या रक्ता-रक्तात आंबेडकर, महात्मा फुले हे आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्याबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करण्यास माझी काहीही हरकत नाही, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत असतांना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन केली जात आहे. तर औरंगाबादमध्ये देखील काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.