मुंबई: मागील काही दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता लवकरच मिटण्याची शक्यता आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दोन्ही राज्यांमधील सीमावाद सोडण्याबाबतचं आश्वासन दिले आहे.
माहितीनुसार, आज महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत अमित शहा यांनी महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद लवकरच सोडवू असं आश्वासन महाविकास आघाडीच्या खासदारांना दिलं आहे.येत्या १४ डिसेंबरला अमित शहा हे यासंदर्भात दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पेटला आहे. त्यातच महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला करण्यात आला. तर कर्नाटकच्या काही वाहनांवर महाराष्ट्रात काळं फासण्यात आलं. दरम्यान, या वादावर केंद्राने लवकरात लवकर तोडगा काढवा अशी मागणी, राज्यातील नेत्यांकडून केली जात आहे.