नवी दिल्ली: गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून मतदारांचे आभार मानले.
मोदी म्हणाले, “विकसित भारताची सर्वसामान्यांची इच्छा किती प्रबळ आहे, हे गुजरातच्या निकालांनी स्पष्ट केलं आहे. देशासमोर आव्हान असताना देशातील जनतेचा भाजपवर विश्वास आहे, हा संदेश स्पष्ट आहे, जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट आज आपल्याला सर्वत्र दिसत आहेत, असेही त्यांनी वक्तव्य केले.

तसेच ते पुढे म्हणाले, “गुजरातच्या जनतेने विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुजरातच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. भाजप हा गुजरातमधील प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक घराचा भाग आहे, तसेच, तरुणांनी भाजपला मतदान केलं म्हणजेच त्यांना भाजपवर विश्वास आहे. तरुणांना जातीपातीचं नाही तर विकासाचं राजकारण हवं आहे, असंही मोदी म्हणाले.