नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे पडसाद आज लोकसभेत उमटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपासून एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबाबत प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत, भारत देश एक आहे आणि देशात हे चालणार नाही. मी अमित शाह यांना विनंती करेन की त्यांनी यावर काहीतरी बोलावं, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, “काल तर हद्दच झाली, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आमचे लोक कर्नाटकात जाऊ पाहत होते. परंतु त्यांना मारहाण केली गेली. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचलं जात आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.