मुंबई: सध्या राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटला आहे. असं असताना आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता, दरम्यान, संजय राऊतांच्या या टीकेचा शंभुराजे देसाई यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
शिंदे गटाचे नेते शंभुराजे देसाई म्हणाले, “संजय राऊत यांनी हाताच्या बाह्या सावरून मोठ्यांनी बोलणं बंद करावं, तुमच्या बोलण्याची पद्धत महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. मी त्यांना शिंदे साहेबांचा एक सैनिक म्हणून सांगतोय की त्यांनी आपलं तोंड आवरावं, तुम्ही आताच साडेतीन महिन्यांचा आराम करून आलात, तुम्हाला परत आराम करण्याची वेळ येऊ नये”, असे वक्तव्य त्यांनी केले.

तसेच ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यास आम्ही दोन हात करायला तयार आहोत, महाराष्ट्र-कर्नाटक वादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिलं जाईल, असं म्हणत देसाई यांनी राऊतांना इशारा दिला आहे.