मुंबई: मंगळवारी महाराष्ट्रातील काही वाहनांवर कर्नाटकात हल्ले करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारसह केंद्राला लक्ष केलं.
राऊत म्हणाले, “कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो. तुम्ही तर स्वत:ला भाई समजणारे मुख्यमंत्री आहेत ना? मग दाखवा ना आता कर्नाटकाला भाईगिरी, कसले भाई तुम्ही, ‘तुम्ही कधी बेळगावात लाठ्या खाल्ल्या, याचा इतिहास दाखवा. नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला एक मिनिटही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले.

तसेच ते पुढे म्हणाले, “आज महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न अचानक उफाळला आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. ताबडतोब सरकारनं बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा, अन्यथा महाराष्ट्राला कठोर पाऊलं उचलावी लागतील, मग तुमचं सरकार खड्ड्यात गेलं तरी चालेल, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.