खानापूर: खानापूरच्या बेणापूर विठ्ठलनगर येथे ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज भरण्याच्या वादातून एका इच्छुक उमेदवाराचे अपहरण करण्यात आले. अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर त्यांनी तरुणाला सोडून दिले. उदय आनंदराव भोसले वय ३८ असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, १ डिसेंबर रोजी तो खानापूर येथील यश कॉम्प्युटर सेंटरमध्ये गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. निवडणूकीच्या वादावारून पत्नी छायाला आपल्या पतीचे अपहरण झाले असावे असा संशय आला. तिने लगेच विटा पोलीस स्टेशनला धाव घेतली. प्रताप करचे उर्फ गब्बर या व्यक्तीनेच आपल्या पतीचे अपहरण केल्याचा तिला संशय असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना अपहरणाच्या तिसऱ्या दिवशी तरुण उदय भोसले खानापूर पोलीस क्षेत्रात आला. त्यावेळी त्याचा पोलीसांनी जबाब नोंदवून घेतला.व बेणापूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी अर्ज भरू नये, यासाठी चौघांनी अपहरण केल्याचे उदयने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी गोरख माने व गोविंद महानवर या दोघांना अटक केली असून मुख्य संशयित गब्बर करचे आणि मिथून घाडगे हे दोघेजण फरार आहेत. या घटनेत वापरलेली ओमनी कार देखील पोलीसांनी जप्त केली आहे.