मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे.

यावेळी ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला दिशा देण्याचं काम केलं आहे. संविधानामुळेच माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. समाजातील सर्व घटकांना समान हक्क आणि न्याय मिळावा हीच बाबासाहेबांची भावना होती. सरकार त्यांच्या विचारावरच चालतं आहे, असं देखील मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.
तसेच, आमच्या सरकारमध्ये इंदू मिलचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही कामाची पाहणी केली तसंच आढावा घेतला आहे. आमचं सरकार बाबासाहेबांच्या मार्गावर वाटचाल करेल, असा निर्धार केला आहे. असं शिंदे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.