बुलडाणा : भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तिखट शब्दात दोन्ही नेत्यांचा समाचार घेतला आहे.
गायकवाड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याची व चिखलफेक करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत असताना दुसरीकडे हे वाचाळवीर पक्षाला अडचणीत आणून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या प्रसाद लाडांचा जन्म पाकिस्तानात झाला वाटतं. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला हे माहीत नाही, असं गायकवाड यांनी म्हटलं.

दरम्यान, महाराष्ट्र हा शिवरायांचा अपमान कधीही सहन करत नाही. ठीक आहे की आम्ही मित्र पक्षासोबत आहोत. मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून आम्ही गप्प आहोत. मात्र यापुढे शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.