हैदराबाद: हैदराबादमध्ये अल्पवयीन मैत्रिणीवर तिच्याच शाळेतील पाच मित्रांनी सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणात शाळेतील पाच विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी विद्यार्थी हे नववी आणि दहावीच्या वर्गात शिकतात.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी आणि पीडित मुलगी हे मित्र होते.यावर्षी ऑगस्टमध्ये आरोपी हे पीडितेच्या घरी गेले होते. त्यावेळी तिच्या घरी कुणीही नव्हते. आरोपींनी तिला धमकावले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. त्यातील एका आरोपीने मोबाइल फोनमध्ये लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओ चित्रीत केला. १० दिवसांनी पुन्हा दोघे जण तिच्या घरी गेले आणि त्यांनी तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. त्यावेळी त्यांनी फोनमध्ये व्हिडिओ चित्रीत केला.
दरम्यान, विद्यार्थिनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडितेने आपल्या कुटुंबीयांना आपबीती सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी हयातनगर पोलिसांत आरोपी मुलांविरोधात तक्रार दाखल करत त्यांना अटक केली.