गुवाहाटी: आसामच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री यांनी आसाममधून मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांच्या संस्कृतीत अनेक साम्यस्थळे असून ही दोन राज्ये सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ यावी यासाठी आसाममध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार आहे.
माहितीनुसार, आसाममध्ये सेवा बजावणाऱ्या मराठीभाषी राजपत्रित अधिकाऱ्यांनी मिळून सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळाने आसाममध्ये सांस्कृतिक भवन उभारावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली. गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे.
तसेच या मंडळाने केलेल्या मागणीनुसार आसाममध्ये महाराष्ट्र भवन सांस्कृतिक भवन आणि विठ्ठल रखुमाईचे मंदिरही उभारण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच आसाममधील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनात महाराष्ट्र आणि आसाम मधील लोकसंस्कृती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील प्रसंग, राज्यातील संतांबद्दलची माहिती याचा अंतर्भाव करण्यात येणार आहे.