मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आता शिंदे गटातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा राज्यपालांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
गायकवाड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होत असेल तर हे चांगलं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील, असा इशाराच आमदार गायकवाड यांनी दिला.
दरम्यान, ‘तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत’, असे वक्तव्य कोश्यारी यांनी केले होते.