बिहार: बिहारमध्ये काल, शनिवारी वैशाली जिल्ह्यातील मेहनार गावात एका भरधाव ट्रकनं तब्बल १५ जणांना चिरडलं आहे. यात १५ लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, हाजीपूर-महानर मुख्य रस्त्यावरील देसरी पोलीस स्टेशन हद्दीतील नयागाव टोलाजवळ हा अपघात झाला. नजीकच्या ब्रह्मस्थान येथे भुईं बाबाची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या अनियंत्रित ट्रकने अनेकांना चिरडले आणि नंतर ट्रक एका झाडावर आदळला. या ट्रकचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेले, ज्यामध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये सहा ते आठ वयोगटातील मुलांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.