पुणे:पुण्यात आजोबा, चुलता आणि वडिलांकडून एका १७ वर्षीय मुलीवर सलग सहा वर्षांपासून अत्याचार केला जात असल्याचा प्रकार समोर आला. पीडित मुलीने कॉलेजमधील समुपदेशन तासाच्यावेळी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. पीडितेच्या घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी फिर्यादीला उत्तर प्रदेशातील आपल्या मुळ गावी राहायला पाठविले. २०१६ ते २०१८ या काळात ही मुलगी साधारण १२ -१३ वर्षाची असताना मुळगावी तिच्या चुलत्याने तिला दमदाटी करुन एक वर्षभर तिच्याबरोबर वारंवार अत्याचार केले.
यावेळी ७० वर्षांच्या आजोबांनी देखील तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. एप्रिल २०१८ मध्ये पीडिता पुण्यात परतल्यानंतर तिने या अत्याचाराची माहिती चिठ्ठी लिहून वडीलांना कळविली. मात्र, वडीलांनी सुद्धा तिच्यावर अत्याचार केले. गेल्या अनेक वर्षांपासून पीडिता हे अत्याचार सहन करत होती. दरम्यान, पीडितेने तिच्या कॉलेजमधील एका कार्यक्रमात आपल्यासोबत घडलेला घटनाक्रम सांगितला.
दरम्यान, समुपदेशकानी या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींविरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी नराधम बापास अटकही केली आहे.