मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर येऊन त्यांना अभिवादन केले. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र, मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “बाळासाहेबांचा आजचा स्मृतीदिन मला वेगळा वाटतो. त्याला कारण आहे. कारण काही जणांना दहा वर्ष लागली शिवसेनाप्रमुखांनंतर शिवसेना प्रमुख कोण हे समजायला. अनेक शिवसेना प्रेमी आहेत. शिवसेना प्रमुख प्रेमी आहेत. त्यांनी सुद्धा त्यांचं प्रेम आणि भावना व्यक्त करायला हरकत नाहीये. पण ते व्यक्त करताना त्याचा बाजार होऊ नये ही भावना आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
बाजारूपणा कशातही दिसता कामा नये. कारण विचार व्यक्त करायला कृती असावी लागते. कृतीतूनही विचार व्यक्त होतात. कृती नसेल तर तो विचार विचार राहत नाही. तो बाजार राहतो. म्हणून शिवसेना प्रमुखांच्या नावाचा बाजार कुणी मांडू नये. त्यांच्या भावना, श्रद्धा, प्रेम समजू शकतो. पण तुम्ही साजेसं काम करा, असा टोला त्यांनी लगावला.